मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या 45 मिनिटांच्या शोमधील काही भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक गाण्याच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित स्टुडिओमध्ये तोडफोड केली.याशिवाय, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कुणाल कामराविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हा मुद्दा विधिमंडळातही जोरदार गाजला, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला.
दरम्यान, कुणाल कामराला शिवसैनिकांकडून धमक्या मिळत असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याने आज इंस्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, तो माफी मागणार नाही. यावेळी त्याने अजित पवारांचा संदर्भही दिला होता, ज्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. कामराने आपल्या वादात महायुतीतील प्रमुख नेते अजित पवार यांनाही ओढले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“मागील काळात मी विरोधी पक्षनेते म्हणून परिस्थितीनुसार भाष्य केले होते. त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, मताधिक्य बहाल केले,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आज मागच्या गोष्टी चर्चेत आणल्या जात आहेत, पण आम्ही सध्या एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षाची भूमिका बजावताना केलेले वक्तव्य त्या वेळेस योग्य होते, मात्र आजच्या परिस्थितीत तसे म्हणणे उचित ठरणार नाही. विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर टीका करताना “गद्दार आणि पन्नास खोके, एकदम ओक्के…” असे विधान केले होते. कुणाल कामराने त्याच व्हिडिओची आठवण करून देत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.
कुणाल कामराच्या या व्हिडीओनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्याा माफी मागण्याचा इशारा दिला आहे. “अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे चुकीच तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच. कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत. ते त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्यांचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यांवर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही.