
शिरुर तालुक्यात ‘स्वयंघोषित’ उमेदवारांचा सुळसुळाट! प्रसिद्धीसाठी हौशे-नवशे-गवशेही रिंगणात
रांजणगाव गणपती : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर ‘स्वयंघोषित’ उमेदवारांचा महापूर उसळला असून, गावोगाव पोस्टरबाजी आणि फ्लेक्सबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शरदचंद्र पवार गट, शिवसेनेचे दोन्ही गट, कॉंग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि आरपीआय या पक्षांकडून अद्याप उमेदवारीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावरील पोस्टर आणि रील्सद्वारे स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.
सामान्यतः पक्षाकडून इच्छुकांची मुलाखत घेऊन, चर्चा करून उमेदवारांची घोषणा केली जाते. मात्र यावेळी वेगळे चित्र दिसत असून, अनेक इच्छुक स्वतःच आपली उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरू करताना दिसत आहेत.“पक्षाचा निर्णय नंतर बघू, सध्या आम्ही मैदानात उतरलोच आहोत,” असा सूर काही इच्छुक उमेदवारांमध्ये दिसतोय. या नव्या ट्रेंडमुळे पक्ष नेतृत्वाचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला संधी दिल्यास, बंडखोरीचा भडका उडू शकतो, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सोशल मीडियावर “भावी सभापती”चा धडाका!
आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गट आणि गणातून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. “कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरणे” या निर्धाराने अनेकांनी मतदारसंघांमध्ये प्रचारयंत्रणा सुरू केली आहे. गटातील मतदारांसाठी तीर्थक्षेत्र भेटी, सहली, कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येत आहे. सोशल मीडियावर “टार्गेट झेडपी २०२५, भावी सभापती, मैदान आपलेच, आता माघार नाही, लक्ष २०२५” अशा संदेशांसह रील्स, ग्राफिक्स आणि व्हिडिओजचा पाऊस पडतो आहे.
इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, आणि यूट्यूबवर या स्वयंघोषित उमेदवारांची जोरदार झुंबड सुरू आहे.
गावोगाव फ्लेक्सबाजीचा पूर
गावोगाव, चौकाचौकांत ‘जनतेचा उमेदवार’, ‘आपला सेवक’ अशा घोषवाक्यांसह लावलेले फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फ्लेक्सबाजीमुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धा उघडपणे समोर येत आहे. पक्षांकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा न होता देखील, इच्छुक उमेदवारांनी आपली छबी तयार करण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.
हौशे, नवशे आणि गवशेही रिंगणात
या निवडणुकीत केवळ राजकीय नव्हे, तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही हौशे-नवशे-गवशेही उतरले आहेत. यातील अनेक उमेदवारांचा हेतू केवळ ‘जनतेत ओळख निर्माण करणे’ एवढाच असल्याचे दिसून येते. अनेकदा हे इच्छुक उमेदवार अर्ज भरल्यानंतर माघारीच्या मुदतीपूर्वीच गायब होतात, हे चित्र स्थानिक राजकारणातील नेहमीचे ‘निवडणूकनाट्य’ बनले आहे.