Amravati मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर! समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर
Amravati News: स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण होत असतानाही मेळघाटातील दुर्गम आदिवासी गावांना पक्क्या रस्त्यांसारख्या मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांच्या अभावामुळे रुग्ण, गर्भवती, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती चौकातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले.(फोटो सौजन्य – AI)
‘ना लोकसभा, ना विधानसभा, सर्वांत मोठी ग्रामसभा’, ‘डोमी ते रुई पठार सिमेंट काँक्रिट रस्ता झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. डोमा, भुसूम, कुही, रुईपठार, खोखोमार, चिलाटी, सिमोरी, कारंजखेडा, मारीता, सावरखेडा, हतरू, रायपूर, बोराटा यांसह अनेक गावांतील रस्त्यांचा प्रश्न आंदोलनातून मांडण्यात आला. आदिवासी गावांना बारमाही वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी विविध मार्गावर टिकाऊ सिमेंट काँक्रिट रस्ते बांधण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये रुई पठार-डोमी नाका, सुमिता-डोमी, डोमा भुसूम), भुसूम खोखोमार, भुसुम-राजा फाटा, चिलाटी-कुही, सिमोरी फाटा-सुमिता (१० किमी), खुटीदा फाटा-एकताई फाटा, हतरू सावरखेडा, रेट्या फाटा-जोडा कुवा, सावरखेडा-रेट्याखेडा, रायपूर-रेट्याखेडा आणि रेट्याखेडा-भुसूम या मार्गांचा समावेश आहे. खुटीदा येथे नदीवर पूल बांधण्याची मागणीही करण्यात आली.
यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम व रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, तसेच कामांसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात हतरूचे उपसरपंच भैय्यालाल मावसकर, ग्रामपंचायत सदस्य गेंदालाल कास्देकर यांच्यासह विविध गावांतील लोकप्रतिनिधी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
दुर्गम भागातील रस्ते, वीज, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येतात, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करावा लागतो. विशेषतः प्रसूतीदरम्यान महिलांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. रस्त्यांच्या अभावामुळे माता मृत्यू झाल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.






