
नागपूर :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी रांगा लावल्या आहेत. अशातच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी आता आपल्या वडिलांच्याच मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशमुख कुटुंबात गृहकलह निर्माण होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार अनिल देशमुख हे नागपूरच्या काटोल नरखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी दावा केला आहे. पण त्यांना याठिकाणी उमेदवारी मिळणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
अनिल देशमुख 2019 मध्ये काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनिल देसमुख यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. शरद पवार यांच्या पक्षानेही त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सलील देशमुख इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व निर्णय शरद पवार यांच्या हातात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून अनिल देशमुख किंवा सलील देशमुख यांच्यापैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने आता शरद पवार यांच्यासमोरचा पेच वाढला आहे.
गृहमंत्रीपदावर असताना तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे तब्बल एक वर्षांहून अधिक काळ ईडीने त्यांना तुरुंगात ठेवले होते. अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनीच या मतदार संघाचा कारभार पाहिला. मतदारसंघातील रखडलेल्या योजना व कामांचा पाठपुरावा करत त्यांनी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी मोठा पाठपुरावा केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतच सलील देशमुख निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण वडील अनिल देशमुख यांच्यामुळे त्यांनी माघार घेतली. पण गेल्या अनेक वर्षांपासून सलील देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. ते सध्या नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.