अंजली दमानियांनी व्हायरल केले लक्ष्मण हाकेंचे 'ते' फोटो; हाकेंच्या आरोपांना दिलं उत्तर
संतोष देशमुख हत्येप्रकरणात ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, अडकवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबत जेवण करताना लक्ष्मण हाके यांचे फोटो ट्विट करत एका व्यक्तीने मला हा फोटो पाठवल्याचे म्हटले होते.आत्ता हवेत गोळीबार करताना फोटो व्हायरल झालेल्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकासह हाके यांचा आणखी एक फोटो दमानिया यांनी ट्विट केला आहे.
‘आणि एक फोटो आला …या वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा हा फोटो. हेच कैलास फॅड व त्यांचे सुपुत्र हे २०२४ च्या निवडणुकीत बूथ वर हैदोस घालत होते’, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. या फोटोमध्ये कैलास फड यांच्यासोबत लक्ष्मण हाके देखील दिसत आहे.
हाके यांचे नाव न घेता अंजलिया दमानिया यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे त्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांसोबत लक्ष्मण हाके यांचे देखील संबंध असल्याचे अप्रत्यक्ष दमानिया सुचवत असल्याचे दिसते.कैलास फड यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजलिया दमानिया यांनी पूर्वी ट्विट केला होता. या ट्विटनंतर बीड पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत फडच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.
लक्ष्मण हाके यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला आहे. ते म्हणाले, वाल्मिक अण्णाचे फोटो जयंत पाटलांच्यासोबत आहेत. सुप्रिया सुळेंच्यासोबत आहेत. वाल्मिक अण्णा निवडणूक जिंकण्यासाठी चालतो, त्यांचे निवडणूक जिंकण्याचे स्किल्ससाठी त्याला जवळ करता. वाल्मिक अण्णाची माणसं राष्ट्रवादी वाढवतात पण टार्गेट करायला वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडेंच दिसतात.