“अमृताहुनी गोड…”; रोहित पाटील बोलताच फडणवीसांना हसू अनावर
मुंबई : संतांच्या वाणीतून ‘अमृता’हूनी गोड नाम तुझे ‘देवा’ हा अभंग आला आहे. संतांच्या वाणीतूनही आपले नाव गोड पद्धतीने घेतले गेले आहे. त्यामुळे येत्या काळात आपणही विरोधी पक्षाला गोड वागणूक द्याल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करत आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात टोलेबाजी केली. तर आपण निष्णात वकील आहात. मीही वकिली पूर्ण करतोय. त्यामुळे एक नंबर बाकावर बसलेल्या वकिलाकडे जसे तुमचे लक्ष असेल तसे माझ्याकडेही आपण लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून केली.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिलेच विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात आमदार रोहित पाटील बोलत होते. देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून विधानसभेत ‘एन्ट्री’ केल्यानंतर रोहित पाटील यांनी आपले पहिलेच भाषण गाजवले. भाषणात टोलेबाजी करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच आमदार रोहित पाटील यांचे भाषण ऐकतच राहिले.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून आमदार रोहित पाटील म्हणाले, आपण जसे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे, त्याच पद्धतीने मीही सर्वात तरुण सदस्य म्हणून विधिमंडळात बसण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वात तरुण सदस्याकडे बारीकपणाने लक्ष द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही निष्णात वकील आहात. मीही वकिली पूर्ण करतोय. एक नंबर बाकावर बसलेल्या वकिलाकडे जसे आपले लक्ष असते, तसे याही वकिलाकडे आपण लक्ष द्यावे. या सदनाची गरिमा राखत असताना अध्यक्ष म्हणून आपण विरोधी पक्षावरही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
विरोधी पक्षाला गोड पद्धतीने वागणूक द्याल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले, संत तुकारामांच्या वाणीतून ‘अमृता’हुनी गोड नाम तुझे ‘देवा’ असा अभंग आलेला आहे. संतांच्या वाणीतूनही आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीने वागणूक द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पाटील म्हणाले.
विधिमंडळात चांगले कायदे तयार व्हावेत
पाटील म्हणाले, विधानसभेत अनेक समित्या गठीत केल्या जातात. त्याच्या माध्यमातून चांगले काम व्हावे, अशी अपेक्षा आहे. अधिवेशनादरम्यान अनेक आश्वासने दिली जातात. मात्र नंतरच्या काळात ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे आश्वासन समितीच्या माध्यमातून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. याशिवाय विधिमंडळात चांगले कायदे तयार व्हावेत. तरुणांना अपेक्षित असणारा नवमहाराष्ट्र घडवत असताना २१ व्या शतकात अभिप्रेत असणारे कायदे या विधिमंडळात तयार व्हावेत, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
राहुल नार्वेकरांना दिल्लीला पाठवायला हवं होतं
विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आजपर्यंत अनेकांनी चांगलं काम केलं आहे. अगदी १९३७ मध्ये डॉ. स्व. मावळकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं होतं. नंतरच्या काळात त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनविण्यात आले. राहुल नार्वेकर यांनीही गेल्या काही वर्षात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांना दिल्लीला पाठवायला हवं होतं, असा मिश्किल टोला आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत लगावला.