डीजे-डॉल्बीला फाटा देणाऱ्या २५ गणेश मंडळांचा सन्मान
वाई : रुंद रस्ते आणि चकचकीत पायाभूत सुविधा उभारल्या म्हणजे विकास झाला, असे मानता येणार नाही. सामान्य माणसाला रोजगार, दर्जेदार आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधा मिळणे तितकेच आवश्यक आहे. विकास करताना निसर्गाची हानी आणि स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी बावधन येथे व्यक्त केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत बावधन ग्रामपंचायत आणि मंगलमूर्ती सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डीजे-डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावातील २५ गणेशोत्सव मंडळांचा, तसेच वृक्षसंवर्धनासाठी योगदान देणाऱ्या तीन वृक्षमित्रांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. हातेकर म्हणाले, विकासाची आवश्यकता नाकारता येणार नाही; मात्र त्यासाठी पर्यावरणाला मोजावी लागणारी किंमतही लक्षात घेतली पाहिजे. सुरूर–वाई रस्त्याच्या रुंदीकरणासाठी होणारी वृक्षतोड, वाढते तापमान आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई यांचा परस्परसंबंध समजून घेण्याची गरज आहे. मोठे प्रकल्प उभारताना त्यांचा स्थानिक नागरिकांच्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचाही विचार व्हायला हवा. समृद्धी महामार्गाचा संदर्भ देत, अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अपेक्षित समृद्धी आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बावधन परिसरातील प्रस्तावित दगडखाणींच्या मुद्द्याकडे निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरे यांनी लक्ष वेधले. या खाणींमुळे निर्माण होणारी धूळ आणि त्याचे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम विचारात घेतले पाहिजेत. हा प्रश्न केवळ बावधनपुरता मर्यादित राहणार नसून वाई परिसरालाही त्याची झळ बसू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. वृक्षरक्षणाविषयी आज्ञापत्रातील विचारांचा संदर्भ देत त्यांनी वृक्षसंपत्ती जपण्याचे आवाहन केले. वाईच्या भाजी मंडईतील वृक्षतोडीनंतर विक्रेत्यांना उन्हात व्यवसाय करावा लागत असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी ध्वनिप्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बावधनकरांचे कौतुक केले. पारंपरिक उत्सवाचा आनंद जपत डीजे-डॉल्बीपासून दूर राहण्याचा मंडळांचा निर्णय अनुकरणीय असून, गावाने ही परंपरा पुढेही कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
विवाह नोंदणीच्या निमित्ताने एक झाड लावण्याच्या ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रशांत धुमाळ यांनी दिली. वृक्षारोपणाला कुटुंबातील महत्त्वाच्या प्रसंगाची जोड देऊन नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वृक्षमित्र संजय मदन भोसले, निलेश अरुणराव शिंदे आणि संजय बाळकृष्ण कुंभार यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नवयुग गणेश मंडळ, अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ, अमर गणेशोत्सव मंडळ, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, श्रीराम गणेशोत्सव मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, जय हिंद गणेशोत्सव मंडळ आणि मानाचा गणपती गणेश मंडळ यांच्यासह एकूण २५ मंडळांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी नारायण घोलप, मंगलमूर्ती सोशल क्लबचे अध्यक्ष धनंजय भोसले, तंटामुक्त संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप कदम, मदन भोसले, चंद्रकांत भोसले, सयाजी पिसाळ पाटील, विजयकुमार रासकर, राजेंद्र कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. केशव कोदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र तरटे यांनी आभार मानले.






