Chhatrapati Sugar Factory
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी दराची घोषणा केली. यंदाचा गळीत हंगाम कारखान्यासाठी महत्त्वाचा असून, कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासद आणि ऊस उत्पादकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चालू हंगामात कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासदांनी तसेच गेटकेनधारकांनी आपला ऊस छत्रपती कारखान्याला द्यावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याचे कामकाज सक्षम करणे आणि शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळवून देणे, या दोन्ही बाबींवर भर दिला जात असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
ऊस वजनातील पारदर्शकता हा मुद्दा पुढे करत कारखान्याने ‘वजन काटा चोख, पैसे रोख’ अशी भूमिका मांडली आहे. सभासद आणि गेटकेनधारकांच्या उसाचे वजन एकाच काट्यावर केले जाते, तसेच साखरेचे वजनही याच व्यवस्थेच्या माध्यमातून केले जाते, असे उपाध्यक्ष निंबाळकर यांनी सांगितले. एक टन म्हणजे अचूक एक हजार किलो वजन, या भूमिकेवर कारखान्याने भर दिला आहे.
ऊस उत्पादकांसोबतच कारखान्यातील कामगारांसाठीही १५ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी १० टक्के बोनस दिवाळीच्या काळात आगाऊ स्वरूपात, तर उर्वरित पाच टक्के बोनस संक्रांतीच्या वेळी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य कारखान्याला मिळत असल्याचे निंबाळकर यांनी नमूद केले. माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष कैलास गावडे, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, अशोक पाटील, शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, अजित नरुटे, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, निलेश टिळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, बाळासाहेब कोळेकर, सुचेता सपकळ, हनुमंत घोळवे, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, विठ्ठलराव शिंगाडे, माधुरी राजपुरे, प्रशांत दराडे, सत्यवान चव्हाण आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.






