
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाब वाढत चालला आहे. याच दरम्यान, काल धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सर्व आमदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले,” पक्ष आणि अजित पवार यांच्या आदेशानुसार मी लगेच राजीनामा देण्यास तयार आहेत. माझ्या विषयी काय करायचं हे तेच ठरवतील.” पण काही व्यक्ती माझ्यावर वैयक्तिक राग ठेवून आरोप करत असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. काल रात्री, अजित पवार यांच्या समोरच धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडली. यावेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर आपली बाजू मांडली. तसचे, अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांविषयी अजित पवार यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना माहिती दिली. अंजली दमानिया यांनी दिलेले सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले असल्याचे अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितले.
संंतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, तसेच सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह जवळपास 150हून अधिक जणांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करीत आहे, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना संशयित म्हणून एसआयटी कडून तपासले जात आहे.