विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती; केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश
महायुतीचा शपथविधी लांबला असला तरी आणि शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी भाजपकडून मात्र शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शपथविधी सोहळ्याआधी भाजपकडून विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली असून उद्या सायंकाळपर्यंत ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ४ डिसेंबर रोजी विधीमंडळ पक्षनेता ठरेल आणि ५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र मोठं राज्य आहे. त्यात भाजपला मोठं यश मिळालं आहे. १३२ जागा भाजपला मिळाल्या आहेत. आता गटनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस याच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दाट आहे. भाजपने निर्मला सीतारामण आण विजय रुपाणी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. दिल्लीतून ते मुंबईत येतील. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली जाणार आहे. या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
निवडून आलेल्या आमदारांमधून पक्षनेता किंवा गटनेत्याचं नाव सूचवलं जाईल. हे नाव दिल्लीत हायकमांडकडे हे निरीक्षक पोहोचवतील आणि त्यानंतर पक्षनेत्याचं नाव जाहीर केलं जाईलं आणि सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानावर त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून ३०-४० हजार लोक बसू शकतील अशी आसान व्यवस्था असणार आहे.
निवडणुका पार पडल्यानंतर विविध पक्षांचे खासदार आणि आमदार निवडून येतात. या निवडून आलेल्या आमदार-खासदारांच्या भूमिका या वैयक्तिक न राहता त्या पक्षाच्या धोरणानुसार असाव्यात, पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध नसाव्यात यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निवडून आलेले सदस्य एकमताने आपला एक नेता निवडतात. या सर्व सदस्यांबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्या नेत्याला दिला जातो.
थोडक्यात सांगायचं झालं तर गटनेता सभागृहात पक्षाच्या सर्व आमदार किंवा खासदारांचं नेतृत्व करत असतो. बऱ्याचदा गटनेता हा त्या सर्व प्रतिनिधींचा प्रमुख मानला जातो. म्हणजेच संबंधित पक्ष विरोधी पक्षात असेल तर अशा गटनेत्याकडेच विरोधी पक्षनेते पद जाते. सत्तेत असेल तर अशा गटनेत्याकडे मुख्यमंत्रिपद जाते. पण असा लिखित नियम मात्र नाही.
गटनेत्याने घेतलेले निर्णय हे पक्षाच्या हिताच्या कक्षेत येणारेच असतात त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या विरोधात कोणत्याच सदस्याला जाता येत नाही. जर कोणता सदस्य या भूमिकेच्या विरोधात केला तर गटनेत्याकडे त्या सदस्याच्या निलंबनाची शिफारस पक्षाच्या अध्यक्षांकडे करण्याचा अधिकार असतो. त्यानतर पक्ष त्या सदस्यावर निलंबनाची कारवाई करतो. त्यामुळेच गटनेत्याला अनन्य साधारण महत्व आहे.