
वर्ग 'ब' मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा मान बोरगाव पोलिस ठाण्यास; प्रशस्तीपत्रक देऊन आले गौरवण्यात
टिटवेवाडी : सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीदरम्यान बोरगाव पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरीची छाप उमटवत वर्ग ‘ब’ मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा मान मिळविला आहे. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बोरगाव पोलीस ठाण्याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या सन्मानामुळे बोरगाव पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर रंजन कुमार शर्मा आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वार्षिक तपासणीमध्ये बोरगाव पोलीस ठाण्याच्या एकूण कामकाजाची पाहणी करण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्याचे प्रशासकीय कामकाज, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकीस आणण्याची कार्यक्षमता तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा मान आढावा घेण्यात आला. या सर्व बाबींमध्ये बोरगाव पोलीस ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत वर्ग ‘ब’ मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरव करण्यात आला.
बोरगाव पोलिसांच्या शिरपेचात मानाचा
बोरगाव पोलीस ठाण्याला मिळालेला ‘वर्ग व मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’ हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण पोलीस टीमच्या सामूहिक कार्याची पावती आहे. प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक आणि प्रत्येक पोलीस कर्मचारी यांनी बजावलेल्या कर्तव्याची ही दखल मानली जात आहे.
पोलीस टीमकडून सातत्याने प्रयत्न
बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे मानले जात आहे. गुन्हेगारीला आळा घालणे, संशयितांवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणे आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस टीमकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक मच्छींद्रनाथ पाटील तसेच बोरगाव पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
वरिष्ठांकडून कौतुकाची थाप..!
वार्षिक तपासणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बोरगाव पोलीस ठाण्याच्या टीमला प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. वरिष्ठांकडून मिळालेला हा गौरव अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, यापुढेही अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. बोरगाव पोलीस ठाण्याला मिळालेल्या या सन्मानामुळे परिसरातील नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, ‘पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी अशा कामगिरीला निश्चितच महत्त्व आहे,’ अशी भावना व्यक्त होत आहे.