मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यभरात सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बीड जिल्हा बंद पाळण्यात आला, तर आता धाराशिव जिल्ह्यातही नागरिकांनी बंदचे आवाहन केले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करावे, अशी मागणी होत आहे. तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच आरोपींना पाठिंबा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Dharashiv Band: धाराशिव बंदची हाक….; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. धाराशिवसह कळंब, भूम, परंडा आणि तुळजापूर येथेही बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या निर्घृण मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनभावना तीव्र झाली असून, त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
बंदला प्रतिसाद देत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवावीत, असे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये, मेडिकल दुकाने, रुग्णालये, बस सेवा आणि पेट्रोल पंप यांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी म्हणून घोषित करावे, अशी नागरिकांची तीव्र मागणी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी आणि नागरिकांकडून बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मल्हारगडावर प्रेमी युगुलांचा पर्यटकावर जीवघेणा हल्ला; डोक्यात दगड आणि…, प्रकरण काय?
बंद शांततेत पार पडावा आणि कोणत्याही व्यापाऱ्याला अडचण होऊ नये, याची विशेष काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे.