hingoli accident
हिंगोली: सध्या महाराष्ट्रात (Maharashtra News) वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर काल धुळ्यात झालेल्या अपघाताने पुन्हा एकच खळबळ उडाली. या दोन घटनांमधून नागरिक सावरत असताना आज हिंगोलीत अपघाताची मोठी घटना घडली आहे. हिंगोलीत झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय.(Hingoli Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या (Hingoli) सेनगावमध्ये भरधाव कार (Car) हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत हॉटेलमध्ये असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. तर दहा वर्षीय चिमुकला या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर शिवसैनिकांचं रास्ता रोको आंदोलन
महामार्गावर रखडलेल्या कामामुळे हा अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय.
धुळे (Dhule) जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावर काल दुपारी 12 वाजता कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाला. या कंटेनरने आधी कारला धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या अपघातामध्ये कंटेनरखाली चिरडून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत जाहीर केली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसंच अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या (Vidarbha Travels) अपघातात 25 प्रवाशांचा बळी गेला. (Samruddhi Highway Accident) या घटनेचा मुंबईच्या फाॅरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास केला. तपासानंतरचा अहवाल त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात आगीचं खरं कारण समोर आलं आहे. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली. यावेळी बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन मग डिझेल टँकवर आदळला. यामुळे 350 लिटर डिझेल सर्वत्र उडालं. डिझेल टँक फुटल्यामुळे उडालेले हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आल्याने बसने पेट घेतला.