डोंबिवली – सध्या डोंबिवलीमध्ये एका वेगळ्याच कारणासाठी वाद पेटला आहे. डोंबिवलीत (Dombivli) एमआयडीसीमधील (MIDC) रासायनिक कंपन्यातील (Company) सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेम्बरमधून लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लोकांमध्ये संतापाची प्रंचड भावना आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यातून बाहेर पडत पावसाच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे या पाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिक संतापले आहेत.
नाले तुंबतात, पाणी साचते
एमआयडीसीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाईप लाईनचे काम सुरु आहे. मात्र कंपन्यापासून सांडपाणी प्रकल्पापर्यत हे सांडपाणी वाहन नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी डेब्रिजच्या गोणी, प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने, प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुंबतात, तसेच येथे पाणी साचते.
लोकांच्या संतप्त भावना…
या नाल्याची सफाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे मात्र यंदा एमआयडीसीकडून ही नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच टाटा पॉवर कडून खंबाळपाडाकडे जाणा-या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेम्बर्समधून रस्त्यावरून वाहत आहे. या लाल रंगाच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे एमआयडीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाउस, गुलाबी रस्ता हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदुषणाचा विळखा असल्याचे उघड झालेले असतानाच, आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदुषणातून मुक्तता करण्यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.