
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू
खिचडीतुन जुलाबाचा त्रास
चिंचोली लिंबाजी येथील नारायण साहेबराव थोटे (३५), पत्नी देवशाला (३०), मुलगी गायत्री (७) आणि मुलगा आयुष (२) या चौघांनी मंगळवारी रात्री घरी खिचडी खाल्ली होती. त्यानंतर बुधवारी पहाटेपासून चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने गुरुवारी त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. गावातील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांना पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना गुरुवारी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास आयुषची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
आयुषच्या मृत्यूने थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गुरुवारी दुपारी बारा वाजता त्याच्या पार्थिवावर वडील नारायण थोटे यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान, आयुषची सात वर्षीय बहीण गायत्री हिची प्रकृतीही गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, आई देवशाला आणि वडील नारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांना अन्नविषबाधा झाल्याने चिंचोली लिंबाजी परिसरातही चिंता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अन्नाच्या सुरक्षिततेचा आणि विषबाधेच्या कारणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील बालकाच्या मृत्यूची दुसरी घटना
कन्नड तालुक्यात बालकाच्या मृत्यूची अलीकडील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी करंजखेड येथे डेंग्यूची लागण झाल्याने १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यात सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.