GBS रुग्णांवरील उपचारांबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना
मुंबई : ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’च्या (GBS) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.
सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत, यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात 31 तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, 11 वर्षांपासून ‘हर घर नल, हर घर में जल’ तसेच स्वच्छता मोहिम राबवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात, असे म्हणावे लागेल. हा आजार पसरू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावती. सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
जीबीएसबाबत सरकार सतर्क : आरोग्यमंत्री
पुण्यात जीबीएस (गुइलेन-बारें सिंड्रोम) या आजाराचे 111 संशयित रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रकाश आबिटकर म्हणाले की, जीबीएस हा आजार नवीन नाही. अनेक वर्षांपासून हा आजार अस्तित्वात आहे. मात्र, पुण्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे हा मुद्दा आता समोर आला आहे. पाण्यातून हा आजार होतो असल्याचे कळते आहे. त्यामुळे जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. या आजाराबाबत सरकार सतर्क असल्याचे ते म्हणाले.