eknath shinde and sanjay raut
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला (Karnataka Election) जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचं प्रमुख आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या रक्तात गद्दारीचे रक्त भिनले असेल तर मात्र तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार कराल, असं राऊत म्हणाले आहेत.
कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहेत. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही.
कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपलं कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान
कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.
संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
मुख्यमंत्री बेळगाव किंवा कर्नाटकात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता के म्हणाले की, त्यांनी कर्नाटकात जाऊन माती खावी किंवा अन्य काही खावे. त्यांनी कोणाचाही प्रचार करावा. आमची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा ही आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी ते 70 वर्षापासून संघर्ष करत आहेत. लढा देताहेत, तुरुंगवास भोगताहेत, गोळ्या खाताहेत. तुम्ही जर स्वत:ची शिवसेना खरी म्हणत असेल तर बेळगावच्या मराठी जनतेशी गद्दारी करू नका. तुमच्या रक्तात गद्दारीचे रक्त भिनले असेल तर मात्र तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार कराल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.