
कोल्हापूर – देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. राज्यामध्ये देखील लोकसभेची निवडणूकीला रंगत आली आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांना संधी देण्यात आली आहे. तसेच महायुतीकडून संजय मंडलिक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये प्रचाराचा धुराळा उडलेला असून यावेळी संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले. प्रचारावेळी संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
संजय मंडलिक म्हणाले, “आत्ताचे महाराज को्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी” असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केला.