rain
मुंबई – परतीच्या पावसाने राज्यात पार दाणादाण उडवली आहे. अशात भारताच्या हवामान विभागाने ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या परतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तो पुढील आठवड्यापर्यंत अनेक राज्यांमधून परत जाईल. सध्या परतीच्या मान्सूनची रेषा बिहारमधील रक्सौल, झारखंडमधील डाल्टनगंज, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, महाराष्ट्रातील जळगावमधून जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांत झारखंडमध्ये मान्सूनचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. १६ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच १७ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात खालच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात नवीन चक्री दाब केंद्र तयार होत आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातही कर्नाटक आणि कोकण किनारपट्टीजवळील खालच्या उष्णकटिबंधीय भागात नवीन चक्रीवादळ दाब केंद्र तयार होत आहे. या दोन्ही परिस्थितीमुळे पुढील आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. याशिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सही तयार होत आहे.
भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. एम. महापात्रा यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी अशी कोणतीही शक्यता नाकारली. ते म्हणाले की, हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आम्ही अद्याप याबाबत कोणतीही सूचना जारी केलेली नाही.