जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला
दत्तात्रय पवार, मेढा : महाबळेश्वर सोसायटी मतदार संघातील राजेंद्र राजपुरे व मजूर-विणकर मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई या दोन दिग्गजांचे अर्ज रिझर्व बॅंकेच्या दहा वर्षांच्या संचालक कार्यकाळाच्या नियमांमुळे अवैध ठरल्याने जिल्हा बँकेतील इतर सात दिग्गजांचे आता अर्ज राहणार की माघार घेतली जाणार? याचा निर्णय सीमोल्लंघनानंतरच होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र या नियमामुळे सर्जेराव सावंत, सत्यजित वीर, काका धुमाळ यांना संचालकपदाची लॉटरी लागणार आहे.
सलग दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही या रिझर्व बँकेच्या अधिनियमाने सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे या दिग्गजांचे अर्ज सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्याने उर्वरित सात दिग्गज उमेदवारांच्या उमेदवारीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र हा नियम लागू शकतो हे ओळखून आधीच अशा दिग्गज उमेदवारांनी पर्याय अर्ज भरले असल्याने नेमकी अर्ज माघारी घेण्याच्या २१ ऑक्टोबर दिवशीच हे चित्र स्पष्ट होईल. (District Bank Election 2026)
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विद्यमान बँक चेअरमन नितीन काका पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांना देखील दहा वर्षे कार्यकाल झालेला आहे.त्यामुळे यातील काही जणांनी काळजी म्हणून आधीच पर्याय अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यातून सर्जेराव सावंत, वाई तालुक्यातून मंत्री मकरंद पाटील तसेच सत्यजित वीर,फलटण मधून संजीवराजे नाईक-निंबाळकर तसेच गृहनिर्माण दूध संस्था मधून प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ यांचे उमेदवारी अर्ज कायम राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नितीनकाका पाटील यांनी अर्ज माघार घेतलाच तर मंत्री मकरंद पाटील नेमके सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढतात की खरेदी विक्री संघातून लढतात हे चित्र देखील २१ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. दहा वर्षांच्या नियमामुळे अनेक दिग्गजांनी आपल्या उमेदवारी सोबत पर्यायी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे दहा वर्षांचा मुद्दा निघाल्यास पर्याय उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्यामुळे काहींना बिनविरोधची संधी तर काही नवीन चेहऱ्यांना बँकेचे संचालक होण्याचा मान मिळणार आहे.
अतिशय प्रतिष्ठेचे ही निवडणूक ठरली असून भाजप,सेना,राष्ट्रवादी यांची अधिकाधिक उमेदवार मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.२१ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असल्याने गेली दहा ते बारा दिवसांपासून उमेदवार निश्चिती बाबत अनेक बैठकातून चर्चा झडल्या. अशा परिस्थितीतच सर्वोच्च न्यायालयाने राजपुरे,देसाई यांचे अर्ज अवैध ठरवल्याने उर्वरित सात दिग्गज आता अर्ज माघार घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर त्यांच्या जागी नेमके कोण निवडणूक लढवणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हास्तरावरील आरक्षित १० जागांवर कोणाला संधी मिळणार तर कोणाचे घट या सीमोल्लंघनात उठणार याचे अंतिम चित्र २१ ऑक्टोबरला समजणार असल्याने सर्वांचेच या दिवसाकडे लक्ष लागून राहिले आहे.
Ans: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सात दिग्गज उमेदवारांचे अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार, याबाबतचा निर्णय दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर होण्याचे संकेत आहेत.
Ans: सात दिग्गज उमेदवारांच्या माघारीच्या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे सावंत, वीर आणि धुमाळ यांना संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
Ans: उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमी होऊ शकते. काही जागांवरील लढतीचे स्वरूप बदलू शकते किंवा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.






