Dr. Anil Bonde
अमरावती : सध्या विशाळगडाचा प्रश्न चांगलाच तापताना दिसत आहे. विशाळगड परिसरात अतिक्रमणांनी अक्षरश: विळखा घातला आहे. याच प्रश्नावरून भाजप आता आक्रमक झाला आहे. कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगड परिसरात 158 अतिक्रमणं होती, ही अतिक्रमणं काढणे आवश्यक आहे. विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी भाजप अमरावतीत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.
डॉ. अनिल बोंडे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगड परिसरात 158 अतिक्रमणं होती, ही अतिक्रमणं काढणे आवश्यक आहे. गडाचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. अमरावतीत देखील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे’. तसेच वर्धा येथे ‘लव्ह जिहाद’ची दोन प्रकरणे आहेत. पोलिसांनी अशा प्रकरणांकडे लक्ष द्यावे. एका प्रकरणात आरोपी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गृहमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मिसिंग असणाऱ्या मुलींची तात्काळ दखल घेऊन चौकशी व्हावी. ‘लव्ह जिहाद’च्या घटना संपूर्णतः कट रचून केल्या जात आहेत. बडनेराचा ‘लव्ह जिहाद’चे जाळे पुलगाव वर्धापर्यंत पोहोचले आहे. अशा प्रकरणांची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
…तेव्हा महिलांना 50 रुपये तरी दिले का?
‘लाडकी बहिण’ योजनेवर बोंडे म्हणाले, ‘माता-भगिनींनी सरकारी कार्यालयातील अर्जाचाच वापर करावा, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. यशोमती ठाकूर जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होत्या, तेव्हा त्यांनी महिलांना 50 रुपये तरी दिले का? आता कोट्यवधी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. महिला बालकल्याण मंत्री असताना यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका, आशा यांचे मानधन वाढवले नाही, कुठल्याही महिलेला मदत केली नाही, असेही त्यांनी सांगितले.