amruta fadnavis and anil jaysinghani
मुंबई: अमृता फडणवीस यांना फोनवरुन धमकी (Amruta Fadnavis Blackmailing Case) आणि लाच दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याच्याविरोधात ईडीनं (ED) मोठा बडगा उभारला आहे. अनिल जयसिंघानी याची 3.40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. ही मालमत्ता स्थावर स्वरुपाची असल्याची माहिती आहे. जयसिंघानी याच्याविरोधात 6 जून रोजी ईडीनं तक्रार दाखल केली होती.
अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अडचणीत
अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच आणि बुकींची माहिती देण्याची ऑफर या अनिल जयसिंघानी यानं दिली होती. या बदल्यात त्याच्यावर असलेले गुन्हे रद्द व्हावेत, अशी त्याची मागणी होती. अमृता फडणवीस यांनी यास नकार दिल्यानंतर व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ आणि मेसेज पाठवून जयसिंघानीनं अमृता फडणवीस यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. अमृता यांच्या तक्रारीनंतर त्याची मुलगी अनिक्षा आणि जयसिंघानी यांना अटक करण्यात आली होती.
कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता
आंतरराराष्ट्रीय क्रिकेट बुकी असलेला अनिल जयसिंघानी याची कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. सट्टेबाजीतून त्यानं ही बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचं सांगण्यात येतंय. गुजारतेतील एका सट्टेबाजाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी तपास करतेय. त्यात ही संपत्ती समोर आलीय. जयसिंघानी याच्या मालमत्ता स्थावर स्वरुपात आहेत. त्यात हॉटेल्स, फ्लॅट, दुकानं यांचा समावेश आहे. जयसिंघानी, त्याचं कुटुंब, नातेवाईक यांची बँक खातीही तपासण्यात येतायेत. जयसिंघानीचं मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु आणि दुबईत असलेलं क्रिकेट बेटिंगचं नेतवर्क, सट्टेबाजीतले त्याचे साथीदार यांच्याही शोध ईडी घेते आहे.