
वाई नगरपरिषदेत सत्तांतर झाले, पण शहराचे प्रश्न 'जैसे थे' ! निवडणुकीतील आश्वासनांचा लोकप्रतिनिधींना विसर
वाई नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, स्वच्छतेला प्राधान्य मिळेल, गटारांची नियमित साफसफाई होईल, रस्त्यांवरील कचऱ्याचे साम्राज्य संपेल आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा वाईकरांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये गटारे तुंबलेली असून, त्यामध्ये अक्षरश गुडघाभर रेती आणि गाळ साचल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गटारांमधील पाणी ओसंडून रस्त्यावरून वाहत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या समस्या नगरसेवकांच्या नजरेस पडत नाहीत की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटार साफ होते, पण कचरा रस्त्यावरच…
वाई नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेचा आणखी एक अजब कारभार नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. गटारांची साफसफाई केल्यानंतर त्यातून काढलेला गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला तसाच टाकून दिला जातो. तो वेळेत उचलला जात नसल्याने पाऊस किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे हाच कचरा पुन्हा गटारात जाऊन साचतो. म्हणजे गटार साफ करण्याचा केवळ दिखावा आणि पुन्हा तीच तुंबातुंबी, असा हा कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
नगरसेवक निवडून आले, पण…
रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पडून राहत असल्याने स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवक निवडून आले, पण नागरिकांच्या प्रश्नांचे काय निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारात जाऊन विकासाची आश्वासने देणारे काही लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर जात असल्याची खंत वाईकर व्यक्त करत आहेत. नगरसेवक म्हणजे केवळ पदाची पाटी किंवा राजकीय प्रतिष्ठा नव्हे, तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्येसाठी प्रशासनाच्या दारात उभे राहणारा लोकप्रतिनिधी असतो. मात्र, प्रत्यक्षात काही प्रभागांतील परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींच्या सक्रियतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
1. वाई नगरपरिषदेत काय बदल झाले?
नगरपरिषदेत सत्तांतर झाले असून नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले आहेत.
2. सत्तांतरानंतर नागरिकांच्या अपेक्षा काय होत्या?
शहरातील स्वच्छता सुधारणे, गटारांची नियमित साफसफाई, कचऱ्याची समस्या दूर करणे आणि मूलभूत प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना होती.
3. सध्या शहरातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत?
अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साचलेला गाळ व रेती, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव या समस्या कायम आहेत.