Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
बुलढाणा: राज्यात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान 45 अंशापेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
उष्माघाताने मृत्यू झालेला 11 वर्षांचा विद्यार्थी शेगाव येथे शिक्षण घेत असल्याचे समजते आहे. कडक उन्हाचा या विद्यार्थ्याला त्रास झाला. त्यानंतर उपचारांसाठी त्याला अकोला येथील रूग्णालयात घेऊन जात असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.
चंद्रपूरमध्ये देखील वाढले तापमान
चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या उषणेमुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मालेगावमध्ये देखील उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र तापला! ‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.
45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.