मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) कायम चर्चेत असतात. परंतु, यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.
दीपाली भोसले सय्यद ट्रस्टतर्फे (Deepali Bhosele Sayed Trust) होणारे व्यवहार चुकीचे आहेत, असा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते. पुरस्कारामध्ये यावेळी ५० लोकांना ५० हजारांचे धनादेश (Cheque) देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे.
दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहे. हा पैसा चुकीच्या मार्गाने आला असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली. दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असून याचे सर्व पुरावे देऊ, असे देखील शिंदे म्हणाले.
भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद प्रोत्साहित करत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा होता, असा आरोपही त्यांच्यावर शिंदे यांनी केला आहे.