मुंबई : देशासह राज्यभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी (Eid Celebration)केली जात आहे. सगळीकडे रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जामा मशिदीसह राज्यभरातील मशिदींमध्ये आज नमाज पठण करण्यात आली.
कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद-उल-फित्रच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवन एकत्र येतात आणि दिल्लीतील जामा मशिदीत (Jama Mashed) नमाज अदा करतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीचं संकट होतं. त्यामुळे राजधानी दिल्लीत मशिदी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुस्लिम बांधवांना साधेपणानंच कोरोना काळात ईद साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र राज्यासह देशातील कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी होते आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळालाय. यावेळी मुस्लिम बांधवांना सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. दोन वर्षानंतर जामा मशिदीत नमाज अदा करण्याची संधी मिळाल्याचं समाधानही यावेळी मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवलंय. अनेकजण आपल्या संपूर्ण कुटुंबासह जामा मशिदीत आले होते.