मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी अचानक औरंगजेबाच्या समर्थनार्थ विधान करत त्याची स्तुती केली. त्यानंतर आझमींवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या भूमिकेमागे कोणते राजकीय हेतू आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तर दुसरीकडे ‘छावा’ चित्रपटाचाही लक्षणीय प्रभाव दिसून येऊ लागला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याची ऐतिहासिक नोंद असली, तरी मागील 300-350 वर्षांत औरंगजेबाच्या थडग्याबाबत कोणतीही ठोस मागणी झाली नव्हती. मात्र, या चित्रपटानंतर भाजपासह अनेक हिंदू संघटना औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली असून, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेबाच्या थडग्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले, ज्यामुळे हा विषय अधिकच चिघळला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या थडग्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Pune crime news: भर चौकात अश्लील वर्तन; गौरव अहुजासह साथीदाराला अटक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ‘ही कबर किती दिवस राहते, ते पाहा’ असे सूचक वक्तव्य करत भविष्यातील घडामोडींना चालना दिली आहे.
27 वर्षे मराठ्यांविरुद्ध लढल्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये, 89 व्या वर्षी झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच त्याचे अंतिम स्थान करण्यात आले. सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्गा परिसरात खुलताबाद येथे ही कबर असून, त्यासाठी त्याने मृत्यूपत्रात 14 रुपये 12 आणे खर्चाच्या सूचनाही दिल्या होत्या.