मंचर : आंबेगाव तालुक्यात कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली असून, कांद्याला बाजार भाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवण करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. चांगल्या कांद्याला सध्या ७० ते १०० रुपये प्रति दहा किलो बाजार भाव मिळत आहे. कांद्याला केलेला खर्च पाहता हातात काही जास्त शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करताना दिसून येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी प्रत्येक शेतकरी दरवर्षी कांदा उत्पादन करत असतो. सध्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली असून कांद्याचे बाजार भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा विकण्याऐवजी साठवणूक करण्याकडे कल वाढला आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला ७० ते १०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत आहे. या दराचा विचार पाहता कांदा पिक तोट्याचे झाले आहे.
लागवडीचा खर्चही वसूल होईना
कांदा बियाणे, लागवड, खुरपणी, काढणी, औषध फवारणी, विज बिल आणि मोठ्या प्रमाणावर मजुरी यामुळे एकंदरीत केलेला खर्च पाहता कांद्याच्या पिशवी माघे शेतकऱ्याला शंभर ते दीडशे रुपये फायदा राहत आहे. त्यामुळे चार महिने पिकवलेल्या कांद्यातून कमी फायदा राहत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवणूकीला पसंती दिली आहे. सध्या काढून झालेला कांदा शेतकरी साठवण करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी
यावर्षी सुरुवातीला वातावरण खराब होते. मात्र, नंतर वातावरण चांगले झाल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कांद्याला बाजार कधी वाढेल याबाबतही खात्री नसल्याचे काही शेतकरी सांगत आहेत .सध्या तरी कांद्याचे बाजार भाव पडल्याने शेतकरी कांदा साठवण करत असल्याचे दिसून येत आहे.