दुग्ध व्यवसायाच्या वाटेने कोकणात कोणी गेले नाही आणि गेले तर यशस्वी झाले नाहीत. प्रशांत यादव यांनी खडतर वाट चोखळत ते यशस्वी झाल्याचे तुम्ही पाहत आहात, अशा शब्दांत प्रशांत यादव यांच्या धाडसाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले आणि वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करताना कोकणवासीयांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला कोकणवासीयांनी साथ द्यावी, असे देखील आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आ. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी खेड दौऱ्यावर आले होते. यावेळी सायंकाळी उशिरा चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आ. जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. रोहिणी खडसे, रत्नागिरी – सिंधुदुर्गचे निरीक्षक बबन कनावजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, भावना घाणेकर, माधुरी पडवळ, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, काँग्रेसचे अल्पसंख्यांक चिपळूण तालुकाध्यक्ष अन्वर जबले आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जयंत पाटील यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची पाहणी करीत या प्रकल्पासंदर्भातील अधिक माहिती यादव यांच्याकडून घेत कौतुक केले. यावेळी आ. पाटील म्हणाले की, घाटावरून चिपळूणात दूध निर्यात व्हायचे. मात्र, प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आव्हान स्वीकारले. याच भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आणि ३५ हजार लिटरपेक्षा जास्त दूध संकलित करून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला कष्टाला दाम देण्याचा प्रयत्न यादव यांचा कृतीशील प्रयत्नांकडे कोकणवासीयांनी आदर्श म्हणून बघितले पाहिजे आणि त्यांना सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, गणेश कदम, संदीप पाटील, वाशिष्ठी डेअरीचे श्री. मगदूम, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते आदी उपस्थित होते.