यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील श्री समर्थ टिम्बर या फर्निचर गोदामाला गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. यामध्ये गोदामातील फर्निचर जळून अंदाजे ८० लाखांचे नुकसान झाले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गोदामचे शटर उघडून पाण्याच्या टँकरने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर कुरकुंभ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
डोळ्यांसमोर पेटलेले दुकान पाहून संदीप दोरगे यांना अश्रू अनावर झाले होते. दोरगे कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातही पाणी आले होते. दुकान पेटल्याने परिसरात धुराचे लोट दिसत होते. माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार तोरात तसेच पोलिसांनी यांनी घटनास्थळी पाहणी केली.