शिरूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) ईडीने त्यांच्या शिरूर येथील निवासस्थानावर धाड टाकली होती. सोळा तास चाललेल्या या कारवाईत बांदल यांच्या घरात पाच कोटी साठ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच आलिशान गाड्या, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरातील निवासस्थानी धाड टाकली. या कारवाईत शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
हेदेखील वाचा: काय आहे मास्क आधार कार्ड, कुठे वापरले जाते, जाणून घ्या
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मंगलदास बांदल यांची जोरदार चर्चा असते. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. पण 2020 मध्ये 50 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
पैलवान म्हणून ओळख असलेले मंगलदास बांदल यांची कारकीर्द कायम वादातच राहिली. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे.पण वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यामुळे ते कायम वादग्रस्त राहिले. फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा बँकेतील खंडणीप्रकरणात ते जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. गेल्या वर्षीच त्यांची जामीनावर सुटका झाली.
हेदेखील वाचा: आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली 2024: इतिहास आणि महत्त्व