पुणे : डेक्कन जिमखाना यांच्यातर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 20 देशांतील अव्वल कुमार खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये मुलांच्या गटात रशियाच्या इव्हान इउत्किन याला तर मुलींच्या गटात फ्रांसच्या डून वैसौद यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट, येथे दि. 2 ते 9 डिसेंबरया कालावधीत रंगणार आहेत.
विजेत्या खेळाडूला एमव्ही देव स्मृती करंडक
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे म्हणाले की, स्पर्धेतील एकेरीतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्या खेळाडूला एमव्ही देव स्मृती करंडक आणि 100 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 60 आयटीएफ गुण देण्यात येणार आहेत. दुहेरीतील विजेत्यांना 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या 45आयटीएफ गुण देण्यात येतील.’’
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, यामध्ये 20 विविध देशांतील कुमार खेळाडूंनी सहभागी झाले आहेत, असे अर्जुन गद्रे यांनी नमूद केले. आश्विनकुमार जंगम म्हणाले की, मरिनच्या आरोग्यदायी उत्पादनाचा नक्कीच फायदा होईल. यासाठी सर्व खेळाडूंना स्पर्धेदरम्यान ही उत्पादने देण्यात येणार आहेत.