पाथर्डी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद द्यावे, यासाठी बीड ते मोहटादेवी अशी दिंडी महिलांनी काढली. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे महिलांची दिंडी आली असता भालगाव ग्रामस्थांनी व भाजप तालुका अध्यक्ष मानिक खेडकर यांनी ढोल-ताशांच्या गजरात महिलांचे स्वागत केले.
बीड जिल्ह्यातून आलेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडे या ओबीसीच्या जनाधार असलेल्या महाराष्ट्राच्या नेत्या असल्याने बीड जिल्ह्याचा केलेला विकास या धर्तीवर पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावा, असे साकडे मोहटादेवी चरणी या महिला घालणार आहेत. भाजपमधील महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ओळख आहे. मोठा जनाधार त्यांच्या पाठीमागे आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसह येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी जनाधाराचा भाजपला फायदा होईल, यासाठी पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात असणे आवश्यक आहे. यावर निश्चित पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे मुंडेसमर्थक भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.