(फोटो सौजन्य-AI एआय)
गोंदियामधील तालुक्यातील कारंजा हद्दीतील विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबविण्यात आली. २३ पानटपरी दुकानादारांकडून ५ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम मंगळवारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आली.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली. सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांवर तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे व पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात कारंजा हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणे व २३ पानटपरी दुकानांवर धाड टाकून तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्यावर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २०२३ अंतर्गत कारवाई केली. ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड यांनी दिली.






