Great Olympian Khasaba Jadhav film in a controversy Pune Court summons famous director Nagraj Manjule
पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉफीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.
पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून नागराज मंजुळेंना समन्स
खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉफी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
गेल्या चार वर्षांत स्वतः नागराज मंजुळे यांच्यासोबत 2 बैठक तर त्याच्या वकिलांसोबत 2 समझोता बैठक अशा एकूण 4 बैठकीत निर्णय न झाल्याने अखेर लेखक संजय दुधाणे यांनी कॉफीराईट कायद्याचा भंग झाल्याचा दावा दाखल केला आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने समन्स पाठवून नागराज मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो व आटपाट प्रोडक्शन यांना आपली बाजू मांडण्यासाठी समन्स पाठविण्यात आले आहे.
रणजीत जाधवांबरोबर बेकायदेशीर करार
खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना नागराज मंजुळे यांनी रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. कोरोनापूर्वी 2019 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाबाबत खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी करार केला होता. मुळात रणजीत जाधव यांनीच 30 ऑगस्ट 2013 रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते.
संजय दुधाणे यांना डावलून संमती करार
आता रणजीत जाधव यांनी संजय दुधाणे यांना डावलून संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ही बाब लेखक संजय दुधाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी मंजुळे यांची 2020 मध्ये खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्यासोबत पुणे भेट घेतली होती. त्यावेळी वाईमधील पट कथालेखक तेजपाल वाघही उपस्थित होते. चर्चेत लेखक म्हणून तुमचे नाव दिले जाईल व रणजीत जाधव यांच्याप्रमाणेच समान वाटा देऊन तुमचा मान राखला जाईल, असा शब्द नागराज मंजुळे यांनी दिला होता. रणजीत जाधव यांनी या प्रस्तावाला होकारसुद्धा दिला होता.
रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक
पुण्यातील बैठकीनंतर सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 26 डिसेंबर 2022 मध्ये संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळे यांना नोटिस पाठवली. कथालेखकाच्या वादामुळे मी चित्रपट करणार नाही असे मंजुळे यांनी रणजीत जाधव यांना कळवले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी रणजीत जाधव यांनी त्यांच्या व नागराज मुजुंळे यांच्या वकिलांसोबत दुधाणे यांची पुणे येथे भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. दरम्यान जिओ स्टूडियोजने खाशाबा चित्रपटाची घोषणा केल्याने मंजुळे यांच्या पुणे येथील स्टुडिओत 8 जुलै 2023 रोजी रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक घेतली. या बैठकीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित क्रीडा प्रशिक्षक रणजीत चामले व पत्रकार विठ्ठल देवकाते उपस्थित होते. लेखक संजय दुधाणे यांचे लेखक, संशोधक तसेच आभार प्रदर्शनात नाव देण्यात येईल व रणजीत जाधवांइतकेच समान मानधन देण्याचे ठरले होते.
3 लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क देण्याची अट अमान्य, अखेर कोर्टात धाव
नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या स्टुडिओत झालेल्या बैठकीतील कराराबाबत नागराज मंजुळे व रणजीत जाधव यांनी उदासीनता दाखविल्याने दुधाणे यांनी नागराज मुंजुळे व जिओ स्टेडिओला कायदेशीर नोटिस पाठवली. यानंतर एका बड्या मध्यस्थीदारामार्फत नागराज मंजुळे यांचे वकील अॅड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये 2 वेळा प्रत्यक्ष भेटून समझोता करार लिहून आणला होता. 3 लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क व चित्रपटाला ना हरकत देत आहेत. असे करारात लिहले होते. लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे सर्व हक्क रणजीत जाधव यांना द्यावे असा करारात अट होती. ही अट मान्य नसल्याने अखेर संजय दुधाणे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली.
पुस्तकाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार
संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरील पहिलेच व एकमेव पुस्तक आहे. यासाठी खाशाबांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2001 मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकाची विक्रमी 15 वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला 2008 मध्ये सर्वोत्कृष्ठ क्रीडा पुस्तकाचा राज्यपुरस्कारही मिळाला आहे. 2004 मध्ये इयत्ता 9 वी व 2015 मध्ये इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होतीे. त्यांनी पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधारात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.