'माझ्याकडे कोणतीही वर्कऑर्डर नाही'; पुतळा कोसळण्याच्या घटनेवर चेतन पाटील यांचा दावा
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर चेतन पाटील यांनी पुतळ्याच्या कामासंदर्भात माझ्याकडे कोणतीही वर्कऑर्डर नसल्याचे म्हटले आहे.
राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. याशिवाय, शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच शिल्पकार जयदीप आपटे हे कुटुंबासह फरार झाले आहेत. तर कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.