सौजन्य- सोशल मिडीया
कुडाळ, प्रतिनिधी : “ भाजप आमदार नितेश राणेंनी अनेक वेळा चॅलेंज केले आहे. मात्र, उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत आणि त्यावेळी ते कोकणात येतील तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा,” असे आव्हान शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिले. कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या अनेक घडामोडींवरही भाष्य केले आहे.
वैभव नाईक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. मी विनायक राऊत यांची माफी मागितली, कारण एक शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन दिवसात राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जो प्रकार मतदारसंघात चालू होता तो आम्ही रोखू शकलो नाही. त्यामुळे विनायक राऊत यांचा माफी मागितली.
नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव आणला. या प्रकाराचे अनेक व्हीडिओ सुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील चार-चार मंत्री सरकारमध्ये असतानाही यांना लोकांवर का दबाव आणावा लागला ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे आणि लोकांची माफी मागावी, असे टोलाही नाईक यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत राणेंनी पैसे वाटून ते निवडून आले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी कोकणातील जनतेची माफी मागितली नाही तर उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यालाही वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुका आता होऊन गेलेल्या आहेत. त्यावेळी जी आश्वासने देण्यात आली होती, ती तशीच आहेत. त्यात नारायण राणे यांनी जर्मनीला २५ हजार युवकांना पाठविणार असे आश्वासन दिले होते. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते की, शिक्षकांची सर्व पदे भरणार तरी अजून आज सुद्धा ५० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन सुद्धा गणवेश साहित्य वाटप मिळालेले नाही.
आज पावसाळ्याने दडी मारली आहे. तरी कृषी अधिकार्यांना या संदर्भात कोणतेही उपाययोजना आखण्यासंदर्भात कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे विरोधक केवळ राजकारण करण्यापुरते आहेत. त्यातून स्वार्थ पाहत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली.
गेल्या दोन वर्षांमध्ये या राज्याला काय मिळाले याचा विचार खरेतर केला पाहिजे. शिवसेना फुटल्यानंतरही जनतेने आज उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवला, जनता त्यांच्याबरोबरच राहिली, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.