बुलढाणा : राज्यामध्ये मागील चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट सांगण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. ७ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांवर ढगफुटीचे संकट आले होते. यावेळी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegoan) आणि खामगाव तालुक्यात ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आलेल्या पूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेतीचे आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे आणि घरातील समान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या झालेल्या नुकसानीची आज बुधवारी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली. शेगाव तालुक्यातील शेजारील गावांमध्ये पळसखेड आणि खामगाव तालुक्यातील कोलारी आणि पिंप्री गवळी गावांमध्ये पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आहे, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे.
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर ज्यांचे संसार उघड्यावर आले त्यांची तातडीने व्यवस्था करण्याची देखील विनंती तुपकरांनी प्रशासनाला केली आहे. तीन दिवस झाले तरी नुकसानग्रस्तांना सानूग्रह अनुदान देण्यात आले नाही, ही शोकांतिका आहे. सरकारने असंवेदनशीलपणे वागत असून जर सरकारने तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई दिली नाही तर नुकसानग्रस्तांना घेऊन आक्रमक आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
कोकण पट्ट्यामधील मुंबई, ठाणे , पालघर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे.