पुणे/पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात असणाऱ्या एका स्पार्क कँडल बनविणाऱ्या कारखान्यात आग लागली. आगीत होरपळून 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी आहेत. हि आग आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागली.
सहा महिलांचे मृतदेह बाहेर
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध सुरु आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.
जखमीमध्ये सात महिला आणि एक पुरुष
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमीमध्ये सात महिला आणि एक पुरुष आहे.
सहा जणांचा होरपळून मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्या आणि फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटलं जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये.
अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण
काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरू आहे.