Weather Update : राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार; तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज

सध्या राज्यात पहाटे आणि रात्री गारठा जाणवत असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी हुडहुडी भरविणारा गारठा जाणवत आहे.
पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता
पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता
Published on: 
Updated on: 

- राज्यात थंडी-पावसाचे दुहेरी संकट

- सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पावसाची शक्यता

- पूर्व विदर्भात किमान तापमानात घट; थंडीचा जोर वाढणार

पुणे : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून, एकाच वेळी थंडी आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, या भागात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या राज्यात पहाटे आणि रात्री गारठा जाणवत असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी हुडहुडी भरविणारा गारठा जाणवत आहे. दुसरीकडे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत आज पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असले तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातही दिवसा कोरडे हवामान राहणार असून, रात्री आणि पहाटे गारठा जाणवेल. या भागातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवस-रात्र तापमानातील फरक कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने डोंगराळ भागातील तापमानात मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी तापमान उणे पातळीपर्यंत घसरल्याचे चित्र आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर

राज्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळामुळे काही भागांत पाऊस झाला होता. आता पुन्हा तापमान आणि हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यासह शेतीवरही त्याचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

FAQ

प्रश्न १ : राज्यात सध्या हवामानाची स्थिती कशी आहे?
उत्तर : राज्यात पहाटे आणि रात्री गारठा, तर दुपारी उन्हाचा चटका अशी संमिश्र हवामानाची स्थिती आहे.

प्रश्न २ : कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे?
उत्तर : सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

प्रश्न ३ : कोणत्या भागात थंडीचा जोर वाढणार आहे?
उत्तर : पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, या भागात थंडीचा जोर वाढणार आहे.