दिशा सालियान मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्यातच काल मंत्री नारायण राणें यांनीदेखील पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना वाचवण्यााठी आपल्याला उद्धव ठाकरे यांनी दोनदा फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला आहे.नारायण राणेंच्या या दाव्यानंतर या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे.
“विश्वास कोणावर ठेवायचा ? असा प्रश्न उपस्थित करत अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ” नारायण राणे म्हणतात नोकराने सुशांत सिंहच्या हत्येचा वीडियो केला आहे. वेळ आल्यावर पुरावे सादर करेन. मग अजून सादर का नाही केले पुरावे असा प्रश्न पडतो. ५ वर्ष झाली या प्रकरणाला , केव्हा येणार यांची ‘वेळ’? का हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे ? जर हे खरं असेल तर काल CBI ने Closure Report कसा file केला ? प्रत्येक गोष्टीच राजकारण,’ अशी प्रतिक्रीया देत अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
विश्वास कोणावर ठेवायचा ?
नारायण राणे म्हणतात नोकराने सुशांत सिंह च्या हत्येचा वीडियो केला आहे. वेळ आल्यावर पुरावे सादर करेन.
मग अजून सादर का नाही केले पुरावे असा प्रश्न पडतो. ५ वर्ष झाली या प्रकरणाला , केव्हा येणार यांची ‘वेळ’ ?
का हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे ?
हे खरं…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 23, 2025
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही मोठे दावेही केले. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा फोन केले होते. तसेच, त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दलही धक्कादायक माहिती दिली. सुशांतसिंह राजपूतची हत्या होत असताना त्याच्या नोकराने मोबाईलवर संपूर्ण शूटिंग केली होती. त्या व्हिडिओमध्ये सुशांतच्या गळ्याला दोरी कशी बांधली जात होती आणि त्याच्यासोबत नेमके काय घडले, याचे स्पष्ट पुरावे आहेत.
मग पोलिसांनी नोकर सावंत याचे जबाब का घेतले नाही? या प्रश्नावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुशांतचा खून त्याचा नोकर सावंत याच्या समोर झाला, परंतु पोलिसांनी अद्याप त्याचे जबाब का नोंदवले नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. सुशांतचा नोकर सावंत नोकर सावंत खैरवाडी येथे राहतो, त्याने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये शूट केली आहे. वेळ आल्यावर आम्ही आमच्याकडील सर्व पुरावे पोलिसांना देऊ. १००% आम्ही सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करू.
नारायण राणे यांच्या या धक्कादायक वक्तव्यांमुळे राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस यावर कोणती पावले उचलतात आणि या नव्या दाव्यांची कसून चौकशी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.