
कराड नगरपालिका झाली 'मालामाल'; तिजोरीत 40 लाखांचा कर जमा
कराड : कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पालिका निवडणुकीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीचशे इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तर करभरणीसाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालिकेत गर्दी केल्याने केवळ चार दिवसांत तब्बल 40 लाख रुपयांचा कर महसूल तिजोरीत जमा झाला आहे.
२०२२ पासून प्रशासकराज असलेल्या कराड नगरपालिकेत गेली अनेक वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा होती. मात्र, निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय गोटे सक्रिय झाले आहेत. विविध पक्ष आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला असून, इच्छुक उमेदवार आपापली तयारी जोरात करत आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर पालिकेचा परिसर नवचैतन्याने गजबजला आहे. यापूर्वी शांत दिसणाऱ्या पालिका इमारतीत आता राजकीय नेते, कार्यकर्ते व इच्छुकांची वर्दळ वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर भरणे आवश्यक असल्याने अनेक इच्छुकांनी पालिकेच्या कर विभागात रांगा लावल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवार व रविवार सुट्टी असूनही कर वसुली विभाग सुरू ठेवण्यात आला होता.
एरव्ही कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या दारात जात असतात; परंतु यावेळी इच्छुक स्वतःहून पालिकेत येऊन कर भरताना दिसत आहेत. या अभूतपूर्व उत्साहामुळे पालिकेच्या तिजोरीत फक्त चार दिवसांत ४० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कर भरण्यासाठी नागरिक येत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कर भरल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुकांचा पालिकेत ओघ वाढला आहे. आतापर्यंत अडीचशे अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण दररोज वाढत आहे. पालिकेच्या वतीने प्रमाणपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ३१ सदस्यसंख्या असलेल्या नगरपालिकेसाठी उमेदवारी इच्छुकांचा आकडा सध्या अडीचशेच्या वर गेला असून, तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश; कराडमध्ये ‘कमळ’ची घोडदौड वेगवान