Ratan Tata Death News Live Updates : मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातच त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांनी हयात असताना कोट्यवधींची संपत्ती जमवली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
हेदेखील वाचा – ‘या’ एका अपमानामुळे बदलले रतन टाटा आणि टाटा मोटर्सचे नशीब, जाणून घ्या कंपनीची यशोगाथा
रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2012 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यावर टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सायरस मिस्त्री यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, संचालक मंडळ आणि कायदेशीर विभागाने 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना काढून टाकण्यासाठी मतदान केले आणि रतन टाटा यांना समूहाचे अंतरिम अध्यक्ष बनवले गेले. रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी माया टाटा यांचे नाव चर्चेत येत आहे.
माया या रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची मुलगी आहे. माया यांची आई आलू मिस्त्री या आयर्लंडच्या नागरिक आहेत. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या त्या बहीण आहेत. टाटा समूहाचा वारसा हाती देण्यासाठी रतन टाटा हे माया यांच्यासाठी तयारी करत होते, असे समजते.
टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट बोर्ड सदस्य
माया या त्यांची भावंडं लेआ आणि नेव्हिल यांच्यासह टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टची बोर्ड सदस्य आहे. टाटा कुटुंबाच्या समृद्ध वारशाचा भाग म्हणून, माया यांच्यात व्यवसाय वाढवण्याची क्षमता देखील आहे.
उत्तराधिकारी निवडण्यासाठी समितीची स्थापना
रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी रतन टाटा, TVS समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी मुत्सद्दी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने 12 जानेवारी 2017 रोजी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.