
जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील व अति गरीब कुटुंबांना कमी पैशात धान्य मिळते. प्रत्येक गावात विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून अथवा परवानाधारकांकडून धान्य वाटपाचे काम पूर्णत्वास नेले जाते. परंतु गेले वर्षभर स्वस्त धान्य दुकानाच्या गेटमध्येच गावातील किराणा दुकानदारांकडून ज्यादा पैशाने घेतले जाते व तेच धान्य भरमसाठ दराने स्वतःच्या दुकानात विकले जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गरिबांना स्वस्त धान्याची गरज आहे की नाही आणि असेल तर धान्य विक्रीचे असे प्रकार राजरोसपणे कसे काय घडत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवसापूर्वीच जयसिंगपूर येथील विकास सोसायटीच्या माध्यमातून अधिकचे धान्य जांभळी (ता.शिरोळ) येथील खाजगी मिल मध्ये उतरल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे. येथील पसार झालेला टेम्पोचालक जयसिंगपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. हा घोटाळा परिवर्तन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. त्यामुळे पुरवठा विभागामध्ये धान्य खरेदी-विक्रीची मोठी साखळी दिसून येत आहेत. असे प्रकार वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विकास सेवा संस्था व धान्य परवानाधारकांच्या दुकानात धाडी टाकून धान्य आवक-जावकचा घोषवारा घेण्याची नितांत गरज आहे.