सोलापूर : मराठा आरक्षणासाठी जरांगे येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणला बसणार आहेत. 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता म्हणजेच मराठा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगेंनी आतापर्यंत पाच वेळेस उपोषण केलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी 17 सप्टेंबरपासूनच उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी इशारा दिलाय. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याची घोषणाच लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना ओबीसीची ताकद या निवडणुकीत दिसेल, असंही हाके म्हणाले.
हाके पुढे बोलतांना म्हणाले की, मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल. जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील. नुसत्या मराठवाड्यात 25 आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार आहेत. आमच्याकडे त्या 25 आमदारांची यादीही तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण
जरांगे पाटील म्हणाले की, ” आमच्या मराठा समाजाच्या मुलांना नये मिळावा यासाठी उपोषण करत आहे. मराठा समाजाचे मुले मोठे झाली पाहिजे. यासाठी मी 17 तारखेपासून म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. कोणीही आपले कामे सोडून आंतरवालीकडे येऊ नये, मी 16 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे”.असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.