Maharashtra Rain Alert:
Maharashtra Rain Alert: राज्यात उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा ताप कायम असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा अद्याप जाणवत असला, तरी उन्हाची झळ काहीशी कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, कोकण, यवतमाळ, वाशीम आणि नंदुरबार या ठिकाणी काल विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून उष्णतेपासून थोडा आराम मिळाला आहे.
दरम्यान, किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटेच्या सुमारास गारवा जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रत्नागिरी आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त, तर अकोला, जळगाव, अमरावती आणि डहाणू येथे ३४ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.
हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!
तसेच रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागात आकाश ढगाळ राहणार असून, हवामान मुख्यतः कोरडे राहील. उकाड्याचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीच्या काळात उकाड्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सतत बदलत्या हवामानामुळे उकाडा आणि पावसाचा लपंडाव सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.