पुणे – राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. सूर्य आग ओकत असल्याप्रमाणे सर्वत्र उन्हाचे चटके बसत आहेत. सर्वजणांना या कडक उन्हाचा त्रास होत असला तरी आता दिलासादायक माहिती समोर येत आहे. राज्यामध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचे हवामान बदलते आहे. मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये 40 अंश तापमान पार केलेल्या भागांमध्ये उष्णेतीची लाट देखील आली होती. मात्र आता राज्याभरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये फक्त पाऊसच पडणार नाही तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग प्रति तास 30-40 कीमी इतका असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला असला तरी गारपीटाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे उन्हाचा ताप कमी करणारा हा पाऊस ठरणार आहे. आज मराठवाडा विभागातील लातूर, नांदेड आणि विदर्भ विभागातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये तर गारपीट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र अद्याप उन्हाचा जोर कायम आहे. अवकाळी आणि पूर्वमोसमी होणाऱ्या या पावसामुळे ऊसाच्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.