मुंबई : गोरेगाव चेकनाका ते मरोळ नाका यांना जोडणारा आरे कॉलनीमधला (Aarey Colony) मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर (Goregaon Check Post) आज सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त (Police Deployment) आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी २४ तासांसाठी बंद असणार आहे. मुंबई महापालिका (MCGM) आणि मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) दिले आहे.
एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळे रात्री १२ पासून पुढील २४ तासासाठी आरे रोड वाहतुकीकरिता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी कृपया पवई/मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/QkY6tnn48c— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 25, 2022
आरे मेट्रो कारशेडच्या (Aarey Metro Carshed) कामासाठी झाडे तोडली जात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी केला आहे. हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
आरेमधील रस्ता अचानकपणे बंद करण्यात आल्याने मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमींमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आरे कॉलनीतील रस्त्याच्या लगत असलेल्या वृक्षांची छाटणी केली जात असल्याचे म्हटले जात आहे. सकाळच्या सुमारास मेट्रो कारशेडच्या जागेवर असलेली झाडे कापली जात नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सकाळी ९ वाजल्यानंतर मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेवरील झाडे तोडली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.