
मनोज जरांगे पाटील व संभाजीराजे छत्रपती येणार एकत्र
कोल्हापूर : विधानसभा निवडणूकांचे वेध राजकीय वर्तुळामध्ये लागले आहे. लवकरच विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होणार असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मात्र सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणूक लढवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी भूमिका जाहीर करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांची युती होणार का अशी चर्चा रंगली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. नाही दिले तर राज्यातील 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याच देखील जरांगे म्हणाले आहे. यासाठी चाचपणी सुरु असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवण्यात आले आहे. त्यावर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक व नेते संभाजीराजे छत्रपती यांनी देखील भूमिका मांडली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या वक्तव्यावरुन या दोन नेत्यांची युती होण्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “माझी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काहीही चर्चा झालेली नाही. मात्र चर्चा होणार नाही हे मी नाकारु शकत नाही. मनोज जरांगे पाटील यांचा दृष्टीकोन आणि माझे उदिष्ट एकच आहे. शेवटी माझ्या पणजोबांनी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घटनेत आणले. मनोज जरांगे पाटील यांना माझ्या नेहमीच पाठींबा राहिला आहे. त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही मात्र लवकर चर्चा होईल,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.