मुंबई – गोरेगाव येथील आयटी पार्कच्या (IT Park) मागील जंगलात भीषण आग (Fire In Forest) लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली, याचा दिंडोशी पोलीस (Dindoshi Police) तपास करत आहेत.
गोरेगाव येथील जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
आग लागलेला भाग हा संजय गांधी नॅशनल पार्कचा (Sanjay gandhi National Park) आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरीण असे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरात अनेक वनस्पतीदेखील आहेत. पावसाळ्यानंतर नॅशनल पार्कमध्ये आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे.